धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे लोणंदमध्ये विशेष प्रदर्शन – इतिहासाच्या नव्या पैलूंना उजाळा

                             पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.   

लोणंद : सुशील गायकवाड. 

लोणंद (ता. खंडाळा) 

         अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि पराक्रम जनतेसमोर आणणारा “धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर” हा चित्रपट नुकताच लोणंद येथील थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या विशेष प्रदर्शनात अहिल्यादेवींच्या सामाजिक कार्याचा, पराक्रमाचा आणि त्यांच्या क्रांतिकारी निर्णयांचा थरार अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.


इतिहासकारांनी आजपर्यंत अहिल्यादेवी होळकर यांना धार्मिक आणि भक्तिरसात न्हालेल्या नेत्या म्हणून मांडले होते, ज्यांच्या हातात शिवपिंड असलेली प्रतिमा परिचित होती. मात्र, या चित्रपटात त्यांच्या सामाजिक सुधारणा, पराक्रम आणि प्रबळ नेतृत्व गुणांचे अनेक पैलू उलगडण्यात आले आहेत. विशेषतः सतीप्रथा बंद करणे, विधवा महिलांना वारसा हक्क देणे, हुंडाबंदीसारख्या समाजातील अन्यायकारक प्रथांविरुद्ध त्यांनी उभारलेला आवाज ठळकपणे दाखवण्यात आला आहे.


चित्रपट प्रदर्शनावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये वाघर मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक राजेंद्र बरकडे, सुजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव, तसेच रोहन धायगुडे, निलेश धूरगुडे, नितीन सुळ यांचा समावेश होता.


या वेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने पाहायला हवा. अहिल्यादेवींनी समाजासाठी केलेले योगदान हे केवळ इतिहास नसून आजच्या काळातही प्रेरणादायी आहे.”


धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांची मांडणी नसून, तो सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा दस्तऐवज ठरतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी हा चित्रपट जरूर पहावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments